बटमालूत सुरक्षा रक्षकांची दहशतवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद

70

जम्मू, दि. १२ (पीसीबी) – जम्मूकाश्मीरच्या बटमालू भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर इतर तीन जवान जखमी झाले आहेत. आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास ही चकमक सुरु झाली. ती अद्यापही सुरुच असल्याचे समजते. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळते.

 

डीजीपी एस. पी. वैद्य यांच्या माहितीनुसार, श्रीनगरच्या बटमालूमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार येथे कारवाई करण्यात आली. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाला. यामध्ये एसओजीचा एक जवान शहीद झाला तर एक पोलिस कर्मचारी आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरुच आहे. येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर येत आहे.


यापूर्वी जम्मूकाश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा रक्षकांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. येथील राफियाबाद भागात ही चकमक झाली होती. यामध्ये सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईनंतर येथे मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात आली होती.