बकरी ईद शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – मुख्यमंत्री

304

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अवघ्या १२ दिवसावर येऊन ठेपलेला बकरी ईदचा सण शांततेत साजरा होण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या सणादरम्यान, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर हा सण शांततेने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) येथे केले. 

बकरी ईद सणानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री   फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतली. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल  आदीसह शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, गेल्या चार वर्षात चांगल्या प्रकारे बकरी ईदचा सण साजरा झाला आहे. यावर्षीही शांततेत बकरी ईद साजरी करावी, सणाच्यादरम्यान, अनुचित प्रकार  टाळण्यासाठी  पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी.  वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभागाने दक्षता घ्यावी. तसेच  सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात यावेत.