‘बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही’

103

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याबाबत केलेल्या टीकेला, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. महाराष्ट्रापुढे खूप मोठी कामे आहेत. देशात पहिल्या पाचमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांचे दुःख मी समजू शकतो. शिवसेनचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही. असे प्रकार बाळासाहेबांपासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोणी केले नाहीत. बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले या चर्चेत आता आम्ही जात नाही, महाराष्ट्रातलं वातावरण आता वेगळे आहे आणि या जनतेला मदतीची गरज आहे”

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह मविआच्या नेत्यांनी कोश्यारींची भेट घेतली. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, “भेटी संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी आपल्या कृतीतून दाखवायला हवं. काल मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटले त्यांचे हसरे चेहरे सर्वांनी पाहिले, त्यामुळे तिकडचा माहोल किती सकारात्मक होता हे समजले असेलच. राज्यपालांवर राजकीय दबाव असेल तर त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राजभवन हा संघर्ष कधी झाला नाही, तो यानिमित्ताने का होतोय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे” हायकोर्टामध्ये येण्याची गरज नव्हती, मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बारा आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे, राज्यपाल यांनी गेले आठ महिने ते केले नाही याचा अर्थ नक्कीच त्यांच्यावर दबाव आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

WhatsAppShare