बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून फोन करून विनवणी

486

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी होऊ नये यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनवणी केल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीमुळेच शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली नसल्याची सुत्रांची माहिती आहे. 

सत्तेत असूनही नेहमी भाजपाविरोधी आंदोलनात सहभागी असणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे शिवसेना बंदमध्ये सहभागी नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ठरू नये असेदेखील  म्हटले आहे.