बँकांमधील घोटाळ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाला दिली होती – रघुराम राजन

313

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – मुद्रा कर्ज, किसान क्रेडिट कार्डसारख्या मोदी सरकारच्या योजनांमुळे बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) वाढ होईल आणि बँकांची स्थिती आणखी नाजूक होईल, अशी भीती भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.  बँकांमधील घोटाळ्यांशी संबंधित बहुचर्चित प्रकरणांची यादी पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली होती, अशीही माहिती राजन यांनी संसदीय समितीला लिहिलेल्या पत्रात दिली आहे. 

मुद्रा कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड लोकप्रिय झाले आहे. मात्र, यामुळे कर्ज जोखीम वाढण्याची शक्यता पाहता त्याचे सूक्ष्म परीक्षण करायला हवे. याचपद्धतीने सेबीद्वारे चालवण्यात येत असलेली एमएसई क्रेडिट गॅरंटी स्कीममध्येही थकबाकी वाढत आहे. यावर त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएसाठी तत्कालीन यूपीए सरकारला जबाबदार ठरवले आहे. मोदी सरकारलाही त्यांनी क्लीन चिट दिलेली नाही. त्यांनी मोदी सरकारच्या अनेक योजना या एनपीए वाढवणाऱ्या असल्याचे म्हटले आहे.