फोटो काढण्यास नकार दिल्याने कंपनीत पाच कामगारांना बेदम मारहाण; तिघांना अटक

50

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – कामावर जात असलेल्या कामगारांना फोटो काढण्यास सांगितले. मात्र, कंपनीत कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने कामगारांनी फोटो काढण्यासाठी नकार दिला. त्यावरून सहा जणांनी मिळून पाच कामगारांना हाताने,लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेदहा वाजता जे ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

महेबूब मकदूम नदाफ (वय 30), हुसेन दादापीर जमादार (वय 29), अमोल सर्जेराव कु-हाडे (वय 27) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासह मोहमद नदाफ, जैनोद्दीन नदाफ, शुभम (पूर्ण नाव माहिती नाही. सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाकरकुमार विजयसिंह ठाकूर (वय 22, रा. गवळीमाथा, भोसरी. मूळ रा. बिहार), निरंजन कुमार सुबोधसिंग, युवराजसिंग विजयकुमार सिंग, सुराजसिंग बल्लूसिंग, रोशनकुमार ललनसिंग अशी जखमींची नावे आहेत. याबाबत दिवाकरकुमार ठाकूर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी ठाकूर आणि त्यांचे चार मित्र एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत कामावर जात होते. ते जे ब्लॉक येथे आले असता आरोपींनी फोटो काढण्यास सांगितले. मात्र, कंपनीत जाण्यासाठी उशीर होत असल्याने फिर्यादी यांनी फोटो काढण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांचा मित्र युवराजसिंग गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare