फेसबुक पोस्ट टाकून परभणीत मराठा तरुणाची आत्महत्या

131

परभणी, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आज आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचे त्यात म्हटले आहे.

अनंत लेवडे-पाटील (ता. सेलू, परभणी) असे त्याचे नाव आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळावे यासाठी समाजातील तरुण आत्महत्याही करत आहेत. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत असलं तरी, आत्महत्यांचं सत्र अजून थांबलेलं नाही. सेलू तालुक्यातील अनंत लेवडे-पाटील या तरुणानं आज (रविवारी) सकाळी ११ वाजता एका शेतात जाऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. ‘मराठा समाजासाठी बलिदान देत आहे. देशासाठी काही करता आले नाही. मात्र, मराठा समाजासाठी बलिदान देत आहे,’ असे त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. या घटनेनंतर संतप्त समाजबांधवांनी अनंतचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यात नेला आणि तिथे ठिय्या मांडला. पोलिस तपास करत आहेत.