फेरीवाल्यांचे पिंपरी महापालिकेसमोर आंदोलन; हॉकर्स झोनची एक महिन्यात अमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

73

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – नॅशनल हॉकर्स फेडरेशन ऑफ इंडिया व  महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने हातगाडी, पथारी, स्टॅालधारकांच्या विविध मागण्यांसाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायकारक कारवाई विरोधात बुधवारी (दि. १८) पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर  आंदोलन करण्यात आले.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. स्वराज अभियानाचे प्रदेशअध्यक्ष मानव कांबळे, प्रदिप पवार, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, साईनाथ खंडीझोड, मधुकर वाघ, नदीम पठाण, प्रकाश साळवे, सुरेश देंडे, वहिदा शेख, मंगल सलगर, मनीषा राऊत, अरुणा सुतार, मुमताज शेख, यासिन शेख, वृषाली पाटणे, विमल प्रधान, मदिना शेख, रत्नप्रभा गायकवाड, सरिता वाठोरे, सिंधुबाई आवारे, बालिका बिरादार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

नखाते म्हणाले, “शहरात सचोटीने व्यवसाय करणाऱ्या हातगाडी, टपरी, स्टॉल्स, पथारीधारकांचे साहित्य बेकायदेशीररित्या पोलीस बळाखाली जप्त केले जात आहे. अशा प्रकारची कारवाई करून पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत आहे. फेरीवाला हा अल्प उत्पन्न घटकात मोडणारा असूनही त्यांचेकडून अतिक्रमण आणि प्रशासकीय शुल्कच्या नावाखाली सुमारे सहा हजारांपासून ते ३८ हजारांपर्यंत दंड वसुलीचा ठराव महापालिका स्थायी सभेपुढे ठेवण्यात आला आहे. हे चुकीचे धोरण आहे. महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीची बैठक दर दोन महिन्याला होणे बंधनकारक असताना ती घेतली जात नाही. महापालिकेने हॉकर्स झोन जागा लवकर अंतिम करून शुल्क आकारलेले ओळखपत्र द्यावे. बायोमेट्रीकचे काम पूर्ण करावे, प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचे सोडून महापालिका प्रशासन फेरीवल्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहे. ही कारवाई बंद न केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.”

त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेनंतर आयुक्तांनी हॉकर्स झोनची अमलबाजावणी एक महिन्यात सुरु करू व उर्वरित बायोमेट्रीक सर्वे करून घेऊ व सदरचे शुल्क ठरावाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.