“फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी वसुली केली”

166

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. 4-4 हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

आम्हाला समीर वानखेडे यांचाही अभिमान आहे. ड्रग्स विरोधात काम करणाऱ्या समीन वानखेडेच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. जाम्सिन वानखेडे यांच्यावर यापुढे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे ज्या-ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असं आव्हानच खोपकर यांनी दिलं आहे.

WhatsAppShare