फायझरची कोरोना लस १२ वर्षांवरील मुलांवरही परिणामकारक

42

वॉशिंग्टन,दि.०५(पीसीबी) : जगभरात कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध झाल्या, मात्र त्या लहान मुलांना दिल्या जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या. कारण कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये बहुतेक चाचण्या प्रौढांवर झाल्या. त्यात लहान मुलांचा सहभाग नसल्याने कोरोना लसीचा लहान मुलांवर कसा परिणाम होणार याविषयी तज्ज्ञांमध्ये देखील साशंकता होती. मात्र, अमेरिकेची कोरोना लस उत्पादन कंपनी Pfizer ने दिलेल्या नव्या माहितीनुसार त्यांची लस 12 वर्षांवरील मुलांवर देखील परिणामकारक आहे. त्यामुळे जगभरातील पालकांना दिलासा मिळालाय. यामुळे भविष्यात 12 वर्षांवरील मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या आशाही पल्लवीत झाल्यात.

आतापर्यंत जगभरात कोरोना लस केवळ 16 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या तरुणांना दिली जात होती. मात्र, फायझरने केलेल्या घोषणेमुळे 12 ते 16 वर्षांवरील मुलांनाही कोरोना लस देण्याचा मार्ग खुला झालाय. फायझरने 12-15 वयोगटातील 2,260 स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी केलीय. त्यांच्या चाचणीनंतरच्या निरिक्षण आणि अभ्यासानंतर त्यांच्यात कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. म्हणजेच या वयोगटात कोरोनाची लस 100 टक्के प्रभावी असल्याचं दिसत आहे.

फायझरचा हा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. याशिवाय अद्याप कोरोना लसीची मोठ्या संख्येत मुलांवर चाचणीही झालेली नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या चाचणीत मुलांमध्ये अँटीबॉडीज सापडल्याने आशेचा किरण दिसलाय. विषाणूंशी लढणाऱ्या अंटीबॉडीची संख्या लहान मुलांमध्ये अधिक आहे. असं असलं तरी प्रौढांप्रमाणेच लसीचे काही प्रमाणात साईड इफेक्टही लहान मुलांमध्ये दिसले. यात ताप, अंगदुखी, थकवा यांचा समावेश आहे. या संशोधनाच्या निष्कर्षासाठी पुढील 2 वर्षे कोरोना लस दिलेल्या स्वयंसेवकांचं निरिक्षण केलं जाईल. त्यांच्यावरील कोरोना लसीचे परिणाम अभ्यासले जातील आणि मगच यावरील निष्कर्ष काढले जातील.

WhatsAppShare