फरार होण्यात तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी केले जेरबंद

1258

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेश राज्यात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत तिघांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई पुणे रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

विकी उर्फ विकास अंकुश भिसे (रा. दळवी नगर), पितम आवतारे (रा. थेरगाव), राजू उर्फ राजकुमार हिरवे (रा. दळवी नगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशला पळून जात असल्याची खात्रीशीर माहिती चिंचवड तपास पथकाचे पोलीस नाईक विजयकुमार आखाडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून  मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने पुणे रेल्वे स्थानकावर सापळा रचून विकी, प्रीतम आणि राजू या तिघा सराईत आरोपींना अटक केली.

विकी भिसे याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर तो चिंचवड पोलीस ठाण्यात आणखी दोन गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार होता. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात ८, निगडी पोलीस ठाण्यात दोन आणि पिंपरी पोलीस ठाण्यात एक असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. पितम आवतारे याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात तीन आणि वाकड पोलीस ठाण्यात दोन असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सीआरपीसी ४१(१) ड ची कारवाई देखील करण्यात आली आहे. राजु हिरवे याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात दंगा आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक राजेंद्र शिरसाठ, विजयकुमार आखाडे, सचिन वरणेकर, पंकज भदाने,पोलीस शिपाई डोके यांच्या पथकाने केली आहे.