नीरव मोदी बाबत इंग्लंड न्यायालयाचा मोठा निर्णय

0
459

लंडन,दि.२५(पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडविणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यापर्ण करण्यात येणार आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविषयीच्या याचिकेवरील सुनावणी वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने आपला निकाल सुनावताना प्रत्यापर्णाला मंजुरी दिली.

नीरव मोदीविरोधात भारतात एक प्रकरण प्रलंबित असून त्याला उत्तर द्यावे लागणार आहे. नीरव मोदीने पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकवण्यासाठी कट रचला होता असेही कोर्टाने म्हटले. नीरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात योग्य उपचार आणि मानसिक आरोग्याच्यादृष्टीने चांगल्या सुविधा देण्यात येईल असेही कोर्टाने नमूद केले.

नीरव मोदीने आपल्या प्रत्यापर्णाला कोर्टात आव्हान दिले होते. जवळपास दोन वर्ष कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. भारतात सुरू असलेल्या खटल्यासाठी नीरव मोदीला भारतात हजर राहवे लागणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

फरार उद्योगपती नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. त्यानंतर तो वँड्सवर्थ तुरुंगात आहे. नीरव मोदी व्हिडिओ लिंकद्वारे सुनावणीला हजर होता. जिल्हा कोर्टाचा हा निर्णय ब्रिटनच्या गृह सचिव प्रीति पटेल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी नीरव मोदीला द्यायची की नाही, याचा निर्णय त्या घेतील.