फडणवीस सरकार मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देणार – एकनाथ पवार

146

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – मराठा समाजाच्या न्याय्य व हक्कांच्या मागणीचा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार देणार आहे. परंतु मराठा तरुणांनी, तरुणींनी भावनेच्या भरात आत्मघाताचे पाऊल उचलू नये, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी (दि. ७) केले.

सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संबंध, दिर्घकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिणामातून समाजबांधवांचे वैचारिक व प्रबोधन करण्यासाठी बारामतीचे प्रशांत (नाना) सातव यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑगस्ट पासून बारामती ते मुंबईला निघालेल्या मराठा संवाद यात्रेचे पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वागत केले. यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, माऊली थोरात, अभिषेक बारणे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. अनेक तरुण, तरुणींनी यासाठी आत्मबलिदान केले. सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संदर्भ, असंतोषाने पेटून भावनिक झालेले समाजाबांधव, आत्मघात करु पाहणारा समाजबांधव, कायदा हातात घेऊ पाहणारे युवक यांच्याशी संवाद साधून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या संवाद यात्रेचे भक्ती शक्ती चौकात नगरसेवक तुषार हिंगे, जांबे गावचे सरपंच अंकुश गायकवाड, संदिप ताथवडे, मच्छिंद्र शिंदे, प्रमोद ससार, दत्तात्रय पवार, सचिन पाटील, कुमार ससार, प्रविण घरत यांनी स्वागत केले. या संवाद यात्रेत समाज प्रबोधन व मराठा आरक्षण चळवळी विषयी जनजागृती करणारी माहिती पत्रके वाटून समाजबांधवांशी संवाद साधण्यात येत आहे. या संवाद यात्रेचा समारोप क्रांतीदिन नऊ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे.