‘फडणवीसांभोवती खुन्यांचा वावर; योग्यवेळी फटाके वाजतील’- उदधव ठाकरे

135

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या आसपास अलीकडे संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत आहेत. दोन-चार खून करून सुटलेले काही लोक भाजपच्या अंतर्गत गोटात घुसले असून त्यांचा वावर मुख्यमंत्र्यांच्या आसपास दिसतो. याबाबत योग्य वेळी फटाके वाजतीलच,’ असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. ‘गृहखात्यात दिवसा पसरलेल्या अंधाराने मुख्यमंत्री गुदमरले आहेत. गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसे व्हायचे! फडणवीसविरोधी गटाने गृहखात्यास वाळवी लावली आहे. त्यामुळेच भीमा-कोरेगाव प्रकरणाने महाराष्ट्र पेटला. याच विरोधी गटाने राज्यातील अबलांवर बलात्कार व खून करायला लावले. या विरोधकांनी लातुरात परवा कोचिंग क्लास मालकाचा खून करायला लावला. नक्षलवाद्यांपेक्षा हे भयंकर असून गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे? यावर रावसाहेब दानवे, आशिष शेलार, एकनाथ खडसे, नितीन गडकरी वगैरे मंडळींनी तत्काळ झोत टाकायला हवा,’ असं आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.