प्लॅस्टरच्या मूर्तींवर सरकार मेहरबान, बंदीला स्थगिती

54

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : गणेश मूर्ती शाडु मातीच्या की प्लॅस्टर (पीओपी) च्या यावर गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. प्लॅस्टरमुळे होणारे जलप्रदुषण आणि मूर्ती विसर्जित न होण्याच्या (तरंगतात) तक्रारी वाढल्या होत्या. अखेर केंद्रीय प्रदुषण मंडळाने प्लॅस्टरच्या मूर्तवर बंदी घातली होती, पण मूर्तीकारांचे नुकसान नको म्हणून यंदापूरती ती बंदी उठवली आहे.

माजी मंत्री आशिष शेलार यांनी पेण परिसरातील हजारो मूर्तीकारांनी अगोदरच मूर्ती तयार करून ठेवलेल्या असतात, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान संभवते म्हणून या वर्षापूरती स्थगिती देण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ठिकठिकाणी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्तीवरील बंदीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर, केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने देशभरात पीओपी मूर्तीवर बंदी घातली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीकारांना शाडूची माती मिळणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीने यंदाच्या वर्षाकरिता शाडू माती ऐवजी पीओपीची मूर्ती करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती.

गणेशोत्सव समन्वय समितीची ही मागणी मान्य करत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पीओपी मूर्तीबंदीला एका वर्षांची स्थगिती दिली आहे.
गणेशमूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णय एका वर्षासाठी स्थगित केला आहे. सध्या अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती बनवून तयार आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक मूर्तीकार आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दिलेल्या निवेदनानुसार प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्द्दल त्यांचे जाहीर आभार, असे या समितीने म्हटलं आहे. त्याशिवाय सर्व मूर्तिकारांचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी समिती कटिबद्ध आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा. त्यानुसार मंडळे, कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. गणेशोत्सवादरम्यान भाविक तसेच आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असेही या समितीने म्हटलं.

WhatsAppShare