प्रो कबड्डीचा आठवा मोसम ‘या’ महिन्यात सुरु होणार

436

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : देशातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमास या वर्षी डिसेंबरपासून सुरवात अपेक्षित असून, स्पर्धा जैव सुरक्षा व्यवस्थेत बंगळूर येथे पार पडेल असे मानले जात आहे.

स्पर्धा बंगळूरच्या कांतीरवा इनडोअर मैदानावर पार पडेल. लीगमधील बंगळूर बुल्स संघाचे हे घरचे मैदान आहे. संयोजक लीगसाठी अहमदाबाद आणि जयपूर यांचाही विचार करत होते. मात्र, अखेर त्यांनी बंगळूरवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. करोनाच्या संकटकाळानंतर भारतात होणारी ही पहिली इनडोअर स्पर्धा असेल.

करोनाचे संकट या वेळे नसले, तरी या वेळेस स्पर्धा दरवेळे प्रमाणे तीन महिने १२ शहरातून होणार नाही. या वेळी स्पर्धा ही एकाच केंद्रावर पार पडणार आहे. लीगसाठी सर्व खेळाडूंचे पूर्ण लशीकरण होणे अनिवार्य असून, स्पर्धेपूर्वी १४ दिवसआधी खेळाडूंनी एकत्र येणे आवश्यक आहे.

लीगचे पहिले विजेते असणाऱ्या जयपूर पिंक पॅंथर्सने आपल्या सरावाची घोषणा केली आहे. त्यांचा सराव १६ ऑक्टोबरपासून डेहराडून येथे सुरू होणार आहे. तेलुगु टायटन्स संघ ७ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे एकत्र येईल. बंगळूर बुल्स या आठवड्यातच आपल्या सरावाला सुरवात करेल. करोना संकाटच्या दुसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे या वर्षी जुलैमध्ये अपेक्षित राहिलेली लीग अखेर वर्षा अखेरीस सुरू होईल.

नव्या मोसमासाठी प्रदीप नरवाल सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, फझल अत्राचेली (यु मुम्बा), मोहमद नबीबक्ष (बंगाल वॉरियर्स) आणि हादी ताजिक (पुणेरी पलटण) या परदेशी खेळाडूंना फ्रॅंचाईजींनी कायम ठेवले आहे. लिलावात एकूण २२ परदेशी खेळाडूना निवडण्यात आले आहे.

दरम्यान,परदेशी खेळाडूंच्या बाबतीत अजून काही माहिती समोर आलेली नाही. ते कधीपासून भारतात येणार आहेत या विषयी अजून संयोजकांनी स्पष्ट केलेले नाही.