प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार ?

153

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होऊ लागली आहे.  सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. कोण, कोठून लोकसभा निवडणूक लढवणार याचे आडाखे बांधले जात आहेत. त्यातच काँग्रेसचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय होणार असून त्या रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

काँग्रेसमधील खात्रीशीर सूत्रांच्या मते, प्रियांका गांधींची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.  रायबरेलीतून २०१९ ला कोण लढणार याबाबत सोनिया गांधींसोबत चर्चा  झाल्यानंतरच निर्णय होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून आतापर्यंत गांधी घराण्यातील व्यक्तींनेच निवडणूक लढवली आहे.

सध्या सोनिया गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत  आहेत. सोनिया गांधी यांची सध्या प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्याकडून या मतदारसंघासाठी योग्य पर्यायाचा शोध सुरू आहे. त्यामुळे प्रियांका गांधीच रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही प्रियांका गांधींनी आपल्या आईसाठी रायबरेली आणि राहुल गांधी यांच्या  अमेठीत मतदारसंघात प्रचार केला आहे. त्यामुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढली आहे.