प्रियकराच्या डोळ्यादेखत प्रेयसीवर सामूहिक बलात्कार झाल्याने प्रियकराची आत्महत्या

1852

कोबरा, दि. १४ (पीसीबी) – डोळ्यादेखत १७ वर्षीय प्रेयसीवर दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याने एका २१ वर्षीय प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील कोबरा जिल्ह्यात घडली.

सवन साई असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. या प्रकरणी ईश्वर दास आणि खेम कनवर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय तरुणी आणि मयत सवन यांचे प्रेमसंबंध होते. शनिवारी १ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास  ते दोघे शाळेजवळ बोलत उभे होते. यावेळी आरोपी ईश्वर आणि खेम हे दोघे तेथे आले आणि त्यांनी जबरदस्तीने तरुणी आणि सवन याला एका अज्ञात स्थळी घेऊन गेले. तेथे आरोपींनी दोघांनाही बेदम मारहाण केली. नंतर सवन समोरच त्याच्या १७ वर्षीय प्रेयसीवर बलात्कार केला.  तसेच बलात्कार केल्यानंतर आरोपींनी सवन आणि त्याच्या प्रेयसीला सोडून दिले अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे.

दुसऱ्या दिवशी आरोपींनी केलेले कृत्य गावातील लोकांना सांगितले. ही बाब सवन याला सुध्दा कळाली यामुळे त्याने आत्महत्या करत जीवन संपवले. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.