प्रा. सोनाली गव्हाणे पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती; बिनविरोध निवड

92

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांची सोमवारी (दि. ९) बिनविरोध निवड झाली. त्यामुळे नगरसेवक सदस्य असलेल्या शिक्षण समितीचा पहिला सभापती होण्याचा मान प्रा. गव्हाणे यांना मिळाला. समितीच्या उपसभापतीपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली.

महापालिकेत यापूर्वी अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात होती. भाजप सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात बदल केला. त्यानुसार महापालिकेच्या विषय समित्यांप्रमाणेच नगरसेवक सदस्य असलेली शिक्षण समिती अस्तित्वात आली. या समितीवर ९ नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची वर्णी लावण्यात आली आहे.

समितीवर ९ नगरसेवकांची निवड केल्यानंतर सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्ज भरण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी भाजपच्या उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठी भाजपच्याच नगरसेविका शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. समितीत भाजपचे वर्चस्व असल्यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदासाठी अर्ज भरले नव्हते. त्यामुळे या दोन्ही पदावर बिनविरोध निवड निश्चित झाली होती.

सोमवारी (दि. ९) सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतीपदासाठी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठीही एकच अर्ज आल्यामुळे शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित सभापती प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापती शर्मिला बाबर यांचे निवडीनंतर अभिनंदन केले.