प्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते

146

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) –  प्राप्तीकराची वसुली गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी झाली असून २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्तीकराचा भरणा विक्रमी १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) दिली आहे.

२०१७-१८ या वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न किंवा प्राप्तीकराचे परतावे भरण्याचा देखील उच्चांक नोंदवला आहे. तब्बल ६.९२ कोटी करदात्यांनी कर परतावा भरला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे २०१६-१७ च्या ५.६१ कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल १.३१ कोटी जास्त करदात्यांनी रिटर्न फाइल केले आहे, असे सीबीडीटीचे अधिकारी शबरी भट्टसाली यांनी सांगितले. या वर्षीही कर परतावा भरणाऱ्यांची संख्या सव्वा कोटींनी वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशान्य भारतातूनही ७ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर जमा झाला आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी ईशान्य भारतातून सहा हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला होता, अशी माहिती ईशान्य भारताचे प्राप्तीकर खात्याचे मुख्य आयुक्त एलसी जोळी रानी यांनी सांगितले.

तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईशान्य भारतातून ८ हजार ३५७ कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्सच्या भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आयकर सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे,  असे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी सांगितले.