प्राधिकरणाची चिखलीतील मोकळी जागा प्लॉटिंग करून बळकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या जागरूकतेमुळे डाव फसला

345

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या चिखली, सेक्टर क्रमांक १३ मधील जागेवर बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून ती बळकावण्याचा डाव जागरूक नागरिकांमुळे फसला. प्राधिकरणाच्या जागेवर प्लॉटिंग पाडून ते बळकावण्याचा प्रकार सोमवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आला. नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात हुसकावून लावले.
चिखली, मोशी या भागात प्राधिकरण संपादित जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. या जागांचा विकास झाला नसल्यामुळे तसेच सीमाभींत किंवा कंपाऊंड नसल्यामुळे जागा मोकळ्या आहेत. त्यामुळे प्राधिकरणाच्या जागांवरील मुरूम चोरी ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यामुळे प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. असे असताना आता प्राधिकरणाच्या मोकळ्या जागांवर डल्ला मारण्याचे प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्राधिकरणाची चिखली, सेक्टर क्रमांक १३ मध्ये सुजय रेसीडन्सीच्यामागे मोकळी जागा आहे. या जागेत बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून ती बळकावण्याचा प्रयत्न सुरू होता. हा प्रकार सोमवारी (दि. ९) सकाळी काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. या नागरिकांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सेक्टर क्रमांक १३ मधील मोकळी जागा कोणाला विकली आहे का?, असा सवाल केला. नागरिकांच्या या प्रश्नाने अधिकारीही चक्रावून गेले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि पोलिसांसह सेक्टर क्रमांक १३ मधील संबंधित जागेवर धाव घेतली.
तेथे आल्यानंतर मोकळ्या जागेचे प्लॉटिंग पाडल्याचे पाहून प्राधिकरणाचे अधिकारीही चक्रावून गेले. प्राधिकरण मालकीच्या जागेत प्लॉटिंग पाडणे बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकांना सांगितले. तसेच या प्रकरणात फौजदारी कारवाईचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. प्लॉटिंग करून जागा बळकावणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात जागेवरून हुसकावून लावले. या सर्व प्रकारामुळे प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा सुरक्षित नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मोकळ्या जागांना सीमाभींत किंवा कंपाऊंड करून ते प्राधिकरणाच्या ताब्यात घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अशा जागांचा परस्पर व्यवहार होऊन तेथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.