प्रसुती रजेनंतर मुलांच्या संगोपनासाठी आता ६ महिन्यांची पगारी रजा

23

मुंबई. दि. ४ (पीसीबी) – प्रसुती रजेननंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना १८० दिवसांच्या पगार रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे. तसेच बायकोचे निधन झालेल्या पुरूषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी १८० दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.

१८ वर्षांच्या आतील मुले असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. या निर्णयामुळे दहावी किंवा बारावीच्या परीक्षा काळात मुलांसाठी १८० दिवसांनी रजा महिला आणि पुरूष कर्मचारी घेऊ शकतील.

बालसंगोपनासाठी असलेली १८० दिवसांची रजा ही विभागूनही घेता येईल. एका वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा ही रजा घेता येईल.

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसांत शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.