”प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे” आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा..

20

बुलढाणा दि .१२ (पीसीबी) – बिग बॉस मराठी 3 च्या सिझनमुळे चर्चेत आलेल्या आणि वादात अडकलेल्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळाने शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. या किर्तनाला मोठी गर्दीही जमली होती. त्यामुळे, कोविड नियमावलींचे पालन न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने आणि कोविड नियमावलींचे पालन न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, आयोजक संदीप राऊत, गणेश मोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाने कुठलीही परवानगी घेतली नव्हती, सदर किर्तनासाठी शिवलीला पाटील या किर्तनकार आल्या होत्या. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले.

‘बिग बॉस मराठी3’मध्ये  एन्ट्री घेतलेल्या एका स्पर्धकाने जाताक्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्या चर्चेत होत्या. कारण त्यांचं बिग बॉस सारख्या शोमध्ये जाणं अनेकांना रूचलं नव्हतं. यावरून शिवलीला ट्रोलही झाल्या होत्या. आजारी असल्याचं कारण देत त्या शोमधून काहीच दिवसांत बाहेर पडल्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी तमाम लोकांची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

WhatsAppShare