प्रशासनाचा 5 कोटींचा 2 अग्निशमन वाहन खरेदीचा प्रस्ताव असताना सत्ताधाऱ्यांकडून 10 कोटींची 4 वाहने खरेदीस मान्यता

45

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत न झाल्याने बोनस मिळालेल्या वाढीव कालावधीचा भाजपच्या स्थायी समितीकडून पुरेपूर वापर केला जात आहे. महापालिकेच्या अग्निशमन  विभागासाठी सहा हजार क्षमतेची 5 कोटी रुपयांची फायर टेंडर ची दोन वाहने खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने आयत्यावेळी स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला. भाजप पदाधिकाऱ्यांनी दहा कोटी रुपयांची सहा हजार क्षमतेची फायर टेंडर ची दोनऐवजी चार वाहने खरेदीस आणि त्यासाठी येणा-या वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वापरासाठी Flood Rescue उकरणांसह एक व्हॅन, फायर टेंडर सहा हजार क्षमतेची दोन वाहने नग, बीई सेट एक व्हॅन आणि फायरफायटिंग वॉटर मिस्ट मोटार बाईक तीन खरेदी करण्याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी 8 जानेवारी 2021 रोजीच्या पत्रानुसार कळविले होते. त्यासाठी वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये  फायरफायटिंग वॉटर मिस्ट मोटार बाईक या वाहनाकरिता एकही निविदा प्राप्त झाली नाही. उर्वरित तीन वाहनांकरिता तीन निविदाधारकांनी दर दिला. त्यात चिखलीतील हायटेक सर्व्हिसेस यांनी Flood Rescue एका व्हॅनचा उकरणांसह 3.90 टक्के जादा म्हणजेच 2 कोटी 15 लाख 59 हजार 250 रुपये, फायर टेंडर 2 वाहनांचा 2.50 टक्के जादा म्हणजेच 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपये आणि बीई सेट एका व्हॅनचा 4 टक्के जादा म्हणजेच 2 कोटी 2 लाख 70 हजार 536 रुपये असे दर दिले. हे दर स्वीकारण्यास हरकत नसल्याबाबत अग्निशमन अधिकारी गावडे यांनी कळविले.

त्यानुसार आयुक्त राजेश पाटील यांनी उपकरणांसह 2 कोटी 15 लाख 59 हजार 250 रुपयांची Flood Rescue एक व्हॅन, सहा हजार क्षमतेची फायर टेंडर (Fire Tender) ची 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपयांची दोन वाहने आणि बीई सेटची 2 कोटी 2 लाख 70 हजार 536 रुपयांची एक व्हॅन हाय टेक सर्व्हिसेकडून खरेदी करण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. त्यावर सत्ताधारी भाजपने या प्रस्तावाला मान्यता देतानाच महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्यक्षात कार्यरत सहा अग्निशामक केंद्रे, महापालिकेचे भौगोलिक क्षेत्राचे कारण देत सहा हजार क्षमतेची फायर टेंडर (Fire Tender) ची 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपयांची दोन वाहने खरेदी करण्याऐवजी चार वाहने खरेदी करण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चाला उपसूचनेद्वारे मान्यता दिली.