प्रशांत किशोर यांची टीम मोदीमध्ये ‘घर वापसी’?

45

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१२ च्या गुजरात निवडणुकांमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावलेले स्ट्रेटेजिस्ट किंवा नियोजनकार प्रशांत किशोर हे पुन्हा भाजपाच्या गोटात परतत असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर भाजपाच्या विरोधकांच्या टीममध्ये बिहार उत्तर प्रदेशमध्ये प्रशांत किशोर दाखल झाले. एका दशकभरात निवडणुकांचे उत्तम नियोजन करणारे अशी त्यांची ओळख तयार झाली. हेच किशोर आता पुन्हा मोदींच्या गोटात जात असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

पुढच्या वर्षी पुन्हा लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम होणार असून त्या पार्श्वभूमीवर किशोर हे घरवापसी करण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ अशी ओळख असलेले किशोर राजकारणाच्या नकाशावर आले मोदींसाठी त्यांनी केलेल्या नियोजनामुळे. मोदींचा अत्यंत विश्वासू माणूस अशी त्यांची ओळख बनली. मधल्या काळात त्यांनी आपल्या कौशल्याचा फायदा भाजपाविरोधकांनाही करून दिला.

मात्र, सूत्रांच्या सांगण्यानुसार किशोर यांच्या खुद्द मोदींसमवेत गेल्या काही दिवसांमध्ये दीर्घ बैठका झाल्या असून त्या २०१९च्या रणनितीचा भाग असू शकतात. तसे असेल तर भाजपाचे नियोजनकार म्हणून किशोर यांची घरवापसी निश्चित मानली जात आहे. तरूणांच्या पाठिंब्यावर जास्त भर द्या, तो प्रचाराचा फोकस ठेवा असा सल्ला किशोर यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.