प्रशांत किशोर यांचा सर्व्हे; राहुल गांधीपेक्षा मोदींनाच नागरिकांची पहिली पसंती

125

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महात्मा गांधी यांच्या १८ सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतील, असा विश्वास देशातील ४८ टक्के नागरिकांनी व्यक्त केल्याचे एका पाहणी अहवालातून समोर आले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप आघाडीवर आहेत.

या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या १८ सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या मार्गावर कोण नेऊ शकेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ४८ टक्के नागरिकांनी पंतप्रधान मोदींना पहिली पसंती दिली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या क्रमांकवर आहेत. या दोघांमधील अंतर हे खूपच मोठे आहे. अवघ्या ११ टक्के नागरिकांना वाटते की राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या १८ सूत्री कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करु शकतील.

महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी गांधीजींच्या १८ सूत्री कार्यक्रमातून ही मोहीम सुरु केली होती. ज्यामध्ये सार्वजनिक सद्भावना, स्वच्छता, दारुबंदी, आरोग्य, शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.

‘नॅशनल अजेंडा फोरम’ असे या मोहिमेचे नाव असून देशातील सुमारे ५७ लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.  कोणता नेता ‘नॅशनल अजेंडा फोरम’ पुढे नेऊ शकतो? यामध्ये नरेंद्र मोदी- ४८ टक्के, राहुल गांधी -११.२ टक्के, अरविंद केजरीवाल – ९.३ टक्के, अखिलेश यादव – ७ टक्के, ममता बॅनर्जी -४.२ टक्के तर मायावती यांना ३.१ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.