प्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी वाढली

64

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या २४ स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत तब्बल १६० जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या कोणत्या २४ कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २४ जागांसाठी १६० अर्ज आल्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना भाजपला नाराजीही ओढवून घ्यावी लागणार आहे.

मिनी महापालिका असा घटनात्मक दर्जा मिळालेल्या क्षेत्रीय समित्यांना (प्रभाग समित्या) राजकीय महत्त्व  आहे. या समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. क्षेत्रीय समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. क्षेत्रीय कार्यालयांकडे येणाऱ्या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात येते. महापालिका आयुक्तांकडून त्यासाठी एका अधिकाऱ्यालाही प्राधिकृत करण्यात येते.

त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. समाजकार्य करत असलेल्या बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींनीच स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी ११ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्यांची संबंधित संघटना ही त्याच प्रभाग समितीच्या हद्दीत समाजकार्य करणारी असावी, संबंधित संघटनेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या २४ जणांना स्वीकृत सदस्या होण्याची संधी प्राप्त होणार आहे. अर्ज करण्याच्या मुदतीत २४ जागांसाठी तब्बल १६० जणांनी अर्ज सादर केले आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयातील सर्वाधिक २९ जणांनी, तर ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वात कमी म्हणजे १३ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत. तसेच अ क्षेत्रीय कार्यालयाकडे २७, ब क्षेत्रीय कार्यालयाकडे २९, क क्षेत्रीय कार्यालयाकडे १९, ड क्षेत्रीय कार्यालयाकडे १५, ई क्षेत्रीय कार्यालयाकडे १३, फ क्षेत्रीय कार्यालयाकडे २४, ग क्षेत्रीय कार्यालयाकडे १८ आणि ह क्षेत्रीय कार्यालयाकडे १५ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत.

आलेल्या अर्जांची पडताळणी करून १३ एप्रिल रोजी वैध आणि अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एखाद्या अर्जाबाबत आक्षेप असेल, तर १७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर २६ एप्रिल रोजी वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रभाग समितीच्या विशेष सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. त्यातून प्रभाग समितीचे सदस्य प्रत्येकी तीन स्वीकृत सदस्यांची निवड करतील.