प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा निवडणूक आयोगाला सादर

169

पिंपरी, दि.6 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार केला. तो आराखडा राज्य निवडणूक आयोगाला आज (सोमवारी) सादर केला आहे. नवा प्रभाग कसा असणार, त्याला कोणता भाग जोडला असेल, कोणता भाग वगळला असेल याबाबत नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. निवडणुकीत 43 प्रभाग आणि 139 नगरसेवक संख्या असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. तीनसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 रोजी एकसदस्यीय पद्धतीने, त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी तीनसदस्यीय पद्धतीने आराखडा तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर रोजी घेतला. त्यानुसार तीनसदस्यीय पद्धतीने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश 3 नोव्हेंबर 21 रोजी महापालिकेला दिले. प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या मुदतीत महापालिका प्रशासन आराखडा तयार करु शकले नाही. त्याचे काम सुरु होते.

प्रभाग रचना करताना भौगोलिक सीमा जुळत नव्हत्या. सीमा जुळविण्यासाठी ब्लॉक तोडावे लागणार होते. पण, ब्लॉक तोडण्यास आयोगाची मनाई होती. त्यामुळे प्रभाग रचना करताना मोठी अडचण आली. त्यामुळे मुदतीत काम झाले नसल्याचे सांगत महापालिकेने आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 5 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करुन 6 डिसेंबर रोजी आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आराखड्याचे काम पूर्ण केले. प्रगणक गट, प्रभाग दर्शविणा-या KML फाईल तसेच सर्व प्रभाग व त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरणपत्र असलेला पेन ड्राईव्ह सील करुन आयोगाला सादर केला.

आयोगाकडून आराखडा तपासला जाईल. त्यात काही बदल असतील तर ते बदल पालिकेला सूचविले जातील. त्यात बदल करुन पुन्हा महापालिका आयोगाला आराखडा सादर करेल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन नागरिकांसाठी आराखडा प्रसिद्ध करेल. हरकती, सूचना मागविल्या जातील. त्यासाठी काही दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. ग्राह्य हरकतीनुसार आराखड्यात बदल करुन अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल. दरम्यान, प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असले, कोणता भाग वगळला असेल याबाबी कच्चा आराखड्यानंतर समोर येणार आहेत.