प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते – माधव भांडारी

507

पुणे, दि. १० (पीसीबी) – भाजप सत्तेवर आल्यास प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी नागरिकांच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिल्याच्या भाषणाची व्हिडोओ क्लिप दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले आहे. पुण्यात पत्रकारांशी भांडारी बोलत होते.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे भाजपने भरपूर आश्वासने दिली, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. या विधानाबद्द्ल भांडारी यांना विचारले असता भांडारी यांनी सारवासारव करत निवडणूक प्रचारात एखादा मुद्दा उपस्थित केला म्हणजे त्याचे आश्वासन दिले, असे होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

गडकरी यांचे विधान मी प्रत्यक्ष ऐकलेले नाही, तरीसुद्धा ते ज्या कार्यक्रमात ते बोलले, तो बिगर राजकीय आणि अनौपचारिक  गप्पा कार्यक्रम होता. त्यामुळे ते विधान हलक्याफुलक्या पद्धतीने केले जाते. त्यामुळे या विधानात राजकीय संदर्भ शोधण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. या विधानाचा अधिक खुलासा नितीन गडकरीच  करू  शकतील, असे ते म्हणाले.