‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा’, शहीद करकरेंच्या वेशात आमदाराचा विधानभवनात प्रवेश

144

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधक वेगवेगळ्या प्रकारे आंदोनल करत राज्य सरकारचा निषेध करत आहेत. कधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तर कधी हातात वेगवेगळे फलक घेऊन विरोधक सरकारप्रती आपला रोष व्यक्त करताना दिसतात. पण नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे वेषांतर केले होते. विधानभवनाच्या गेटजवळ पोलिसांनी गजभिये यांना अडवण्याचा प्रयत्नही केला.

यावेळी प्रकाश गजभिये यांनी हातात एक फलक घेतला होता. यावर लिहिण्यात आले होते की, ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलेलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शहीद झालो’. प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

‘हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना शाप दिला होता. त्यामुळेच त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला’, असे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रकाश गजभिये हे हेमंत करकरे यांच्या वेशात आले होते.