प्रचंड अस्वस्थ आहोत, पण पक्ष सोडणार नाही – एकनाथ खडसे

333

 जळगांव, दि. २९ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणारच नाही,  अशी खदखद व्यक्त करत कितीही अपमान सहन करावा लागला, तरी आपण ४० वर्षे भाजपची सेवा केल्याने पक्ष संघटन वाढीत आपला थोडाफार का होईना खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू, अशी अगतिकता माजी मंत्री एकनाथ खडसे खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत व्यक्त केली.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी खडसे बोलत होते. यावेळी  खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर त्यांनी केवळ योग्य वेळी पुनरागमन होईल, असे उत्तर दिले. ती योग्य वेळ कधी येणार, असे विचारल्यावर त्यांच्याच शेजारी बसलेले खडसे यांनी अशी वेळ येणारच नाही, असा टोला लगावत प्रदेशाध्यक्षांना निरुत्तर केले. यामुळे गोंधळलेल्या दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. नंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या सव्वादोन वर्षापासून आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहोत. सर्व प्रकारची चौकशी पूर्ण झाली. परंतु पुन्हा पुन्हा चौकशीच्या नावाखाली आपल्याला मंत्रिपद दूरच, परंतु स्वस्थ झोपूही दिले जात नाही. त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ आहोत. अनेकदा चौकशा झाल्या, त्यात काहीही तथ्य आढळले नाही. सरकार अजूनही पुढे काही वर्षे आपली चौकशी लांबविण्याची शक्यता आहे. चौकशी मागून चौकशी करीत आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.