पौडमध्ये निवासी शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

88

पुणे, दि. २ (पीसीबी) – इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांने वसतिगृहाच्या राहत्या खोलीत वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील इंडस इंटरनॅशनल स्कूल, आंग्रेवाडी येथे घडली असून शनिवारी (दि.१) उघडकीस आली.

निश्चय आकाश गर्ग (वय १७, सध्या रा. इन्डस इंटरनॅशनल स्कुल, आंग्रेवाडी, भुकूम, ता. मुळशी, मूळ रा. चंडीगड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निश्चय हा मुळशीतील आंग्रेवाडी येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होता. तो मुळचा चंदीगडचा असून शाळेतील वरिष्ठ मुलांच्या वसतीगृहात राहत होता. शुक्रवारी रात्री त्याने राहत्या खोलीतील खिडकीला इलेक्ट्रीक वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला.  माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निश्चय याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. निश्चयचा मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पौड पोलिस तपास करत आहे.