पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होता AC ‘डान्स बार’! पोलिसांनी धाड टाकली आणि….

71

पुणे, दि.२९ (पीसीबी) : शहरातील उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुडजे गावातील लबडे फार्म हाऊसवर सुरू असलेल्या खासगी डान्स बारवर उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकून 9 जणांना अटक करत ताब्यात घेतलं. तिथे मुंबईतील 4 आणि पुण्यातील एक अशा एकुण 5 डान्सर मुली डीजेवर डान्स करत होत्या. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील 4 कॉन्ट्रॅक्टरचा समावेश आहे.

उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या असून त्यामध्ये नको त्या गोष्टींसह स्कॉचच्या (उंची दारू) बाटल्यांचा देखील समावेश आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी यापुर्वीच आदेश दिले होते. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे आणि त्यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. कडक लाकडाऊनमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी चालु डान्स बार पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पुणे महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्टर विवेकानंद विष्णु बडे (42, रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे), मंगेश राजेंद्र शहाणे (32, रा. रामदास सोसायटी, प्लॉट नं. 58, संतनगर, अरण्येश्वर, पुणे), ध्वनीत समीर राजपुत (25, रा. पुरंदर हाऊसिंग सोसायटी, बी/06, पुणे-सातारा रोड, पुणे), निलेश उत्तमराव बोधले (29, रा. पुरंदर हाऊसिंग सोसायटी, ए/903, म्हाडा कॉलनी, पुणे) यांचा समावेश आहे. यांच्यासह पोलिसांनी समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (39, रा. आगळंबे फाटा, कुडजे गाव, ता. हवेली, पुणे), प्राजक्ता मुकुंद जाधव (26, रा. जाधव चाळ, दत्त मंदिर रोड, वाकोला पाईपलाईन, गावदेवी, मिलींद नगर, सांताक्रुझ, पुर्व मुंबई), निखील सुनिल पवार (33, रा. 59/06, पर्वती दर्शन, पुणे), सुजित किरण आंबवले (34, रा. बालाजीनगर, 25/80, सातारा रोड, पुणे) आणि आदित्य संजय मदने (24, रा. निजामुद्दीन चाळ, मोगरा पाडा, अंधेरी पुर्व, मुंबई) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. त्यापैकी मंगेश शहाणे, निखील पवार, ध्वनीत राजपुत, सुजित आंबवले, निलेश बोधले आणि आदित्य मदने यांनी केलेला अपराध हा जामिनकीचा असल्याने त्यांना योग्य तो लायक जामीन देण्यात आल्याने त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी समीर उर्फ निकेश पायगुडे, विवेकानंद विष्णु बडे आणि प्राजक्ता मुकुंद जाधव यांना न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांना पाहिजे असलेला आणि पळून गेलेला आरोपी संदीप चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि लबडे फार्म हाऊसचे मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उत्तमनगर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिथं 5 डान्सर मुली आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली आहे. डान्सर मुलींमध्ये 1 मुलगी ही कात्रज परिसरातील असून इतर सर्व जणी या मुंबई, कल्याण आणि ठाणे परिसरातील आहेत. पोलिसांनी ही कारवाई बुधवारी मध्यरात्री केली आहे. लबडे फार्म हाऊसवर बुधवारी रात्री पावणे 11 ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान डीजे लावून मिनी डान्सर बार चालु होता. एसी हॉलमध्ये हा उद्योग चालु होता. पोलिसांनी तिथे आढळून आलेल्या दारूच्या बाटल्या आणि इतर आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या आहेत.कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलिस अधिकारी किरण देशमुख, शिवाजी दबडे, अमोल भिसे, धनंजय बिटले, महिला कर्मचारी रेश्मा वर्पे यांच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे.पुण्यासारख्या ठिकाणी फार्म हाऊसवरील डान्स बारचा पर्दाफाश झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, फरार असलेल्या आरोपींबाबत पोलिस सखोल माहिती घेत असून दाखल गुन्हयातील सर्व आरोपींवर पोलिसांचा वॉच असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारचा डान्स बार आणखी कुठे चालू आहे काय याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत.मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील डान्सर तरूणी कडक लॉकडाऊनमध्ये पुण्यात आल्याच कशा याचा देखील तपास करण्यात येत आहे. त्या मुलींना पुण्यात आणण्यासाठी कोणी-कोणी कोणाला कॉल केले, तसेच ज्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आदी बाबींचा देखील पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीत असणार्‍या आरोपींकडे सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

WhatsAppShare