पोलीस चौकीत चल म्हणत व्यक्तीचे अपहरण

139

पिंपरी दि. १६(पीसीबी) – रिक्षातून जात असलेल्या एका व्यक्तीला कार मधून आलेल्या दोघांनी ‘पोलीस चौकीला चल’ असे म्हणत जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि अपहरण करून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास ताथवडे येथील महापालिका ऑक्सिजन पार्कच्या गेटसमोर रस्त्यावर घडली.

विनय सुंदरराव नाईक (वय 40, रा. गारखेडा परिषद, औरंगाबाद) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रफिक अलाउद्दीन सय्यद (वय 38, रा. काळेवाडी फाटा, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र विनय नाईक हे शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास थेरगाव येथून ताथवडे येथे रिक्षातून जात होते. त्यांची रिक्षा ताथवडे येथील महापालिका ऑक्सिजन पार्कच्या गेट समोर आली असता रिक्षाच्या मागून येणा-या एका कारने रिक्षाला ओव्हरटेक केले आणि रिक्षाला कार आडवी लावली.

कार मधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी ‘विनय तूच आहे का, आमच्या सोबत चौकीत चल’ असे म्हणून विनय नाईक यांचा हात पकडून त्यांना कारमध्ये बसवले. विनय यांचे दोन अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले. याबाबत रिक्षा चालकाने फिर्यादी यांना सांगितले असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.