पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार भरवून आयुक्तांनी दिली चॉईस पोस्टींग तरी काही कर्मचारी खूश तर काही नाराजच

158

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – कामात पारदर्शकता यावी तसेच मोठा वशीला लावून आणि पैसे चारुनच पोलीस खात्यात बदली होते हा समज मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा आज (मंगळवार) सकाळी आयुक्तालय कार्यालयात जाहिर दरबार भरवला. या उपक्रमातून त्यांनी आयुक्तालय हद्दीतील इच्छीत स्थळी काम करण्यासाठी अर्ज मागून घेतले होते.

त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना इच्छीत स्थळी जायचे आहे. त्या स्थळाच्या नामफलका समोर उभा करण्यात आले होते. मात्र यावेळी काहींची इच्छीत स्थळी बदली करण्यात आली तर काहींची इच्छीत स्थळी बदली झाली नाही. काही पोलीस ठाण्यात जागा रिक्त नसल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी जायची इच्छा असल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. तसेच त्यांना भलतीकडेच बदली देण्यात आली. यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर होता.

आयुक्तालय हद्दीत सध्या १५ पोलीस ठाणे आहेत. त्यांचे तीन-तीन विभागांमध्ये विभाजन करुन पाच पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यामध्ये भोसरी पिंपरी, चाकण, वाकड आणि देहुरोड या पाच विभागांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या विभागात नव्या कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता दाखवण्यास संधी दिली जाणार आहे. यामुळे बऱ्याच वर्षांपासून एकाच ठिकाणी बसतान बसवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच गोची झाली आहे.

सध्या हिंजवडी पोलीस ठाणेअंतर्गत बावधन, देहुरोड पोलीस ठाण्यातअंतर्गत रावेत, चाकण पोलीस ठाणेअंतर्गत म्हाळुंगे आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शिरगाव या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु करण्याची मागणी होती. ती मंजुरीच्या अंतीम टप्प्यात आहे. यामुळे कर्मचारी संख्या वाढवणे अत्यंत आवशक झाले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी पोलीस जादा तास काम करत आहेत. यामुळे ते नाराज असल्याचे समजते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड खराब आहे त्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. आता ज्या कर्मचाऱ्यांची इच्छीत स्थळी बदली झाली आहे. ते काम कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.