पोलिसात तक्रार दाखल केल्याने विठ्ठलनगरमध्ये टोळक्यांचा धुमाकुळ; कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना दिली जीवे मारण्याची धमकी

147

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – घरांवर दगडफेक करुन तसेच कोयत्याचा धाक दाखवून सहाजणांच्या टोळक्यांनी परिसरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.१६) सायंकाळी चारच्या सुमारास विठ्ठलनगर येथील जगदीश सुपर मार्केटजवळील मटण गल्लीत घडली.

याप्रकरणी एका ५५ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम बोराडे (वय २५), दिनेश (वय २६), सुरज घोडके (वय २४), उमेश सटवा सरवदे (वय २६), गणेश सटवा सरवदे (वय ३०) आणि महेश सटवा सरवदे (वय २२, सर्व रा. मटण गल्ली, विठ्ठलनगर, पिंपरी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ५५ वर्षीय महिला या मंगळवार सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारी काही नातेवाईकांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. यावेळी सहा जणांचे टोळके लोखंडी रॉड, कोयता, दांडके आणि दगड हातात घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी परिसरातील घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याबाबत महिलेने त्यांना जाब विचारला असता आरोपींनी, “तु आमच्या नावाची पोलिसात तक्रार केली आहे का”, अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. यावर महिलेचा जावई आणि मुलींनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांना देखील कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच परिसरात दहशत बसावी म्हणून धुमाकुळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी उमेश सरवदे याला अटक केली आहे. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.