पोलिसांचे ओळखपत्र आणि वर्दी घालून तोतयागिरी करणा-या महिलेसह दोघांना अटक

271

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – एका संशयित आरोपीच्या भावाने आणि त्याच्या होणा-या पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न केला. महिलेने ती मुंबई पोलीस दलात असल्याची बतावणी करून पोलिसांचे ओळखपत्र दाखवत तोतयागिरी केली. तसेच एमआयडीसी भोसरी पोलिसांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.

संतोष गंगाधर पोटभरे (वय 24, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी), कविता प्रकाश दोडके (वय 27, रा. मोहननगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी भागवत शेप यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पोलीस कर्मचारी भागवत हे संशयित आरोपी बाळू गंगाधर पोटभरे याचा शोध घेण्यासाठी बालाजीनगर येथे गेले होते. त्यावेळी आरोपी संतोष पोटभरे हा तिथे उभा होता. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने पोटभरे असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे संशयित आरोपीबाबत विचारणा केली असता त्याने घर दाखवतो, असे म्हणत पुढे चालू लागला. त्यानंतर तो गल्ली बोळातून पळून गेला.

यामुळे पोलिसांनी त्याची माहिती व मोबाइल नंबर घेतला. पोलिसांनी आरोपी संतोष याला फोन करून आरोपी बाळू याच्याबाबत विचारले असता त्याने त्याची पत्नी मुंबईत पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत उद्या तुमची पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर महिला आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान करत आपण मुंबई पोलीस दलात असल्याचे सांगितले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.