पोलादपूर बस दुर्घटना; १७ मृतदेह दरीतून बाहेर काढले, मृतांच्या वारसांना ४ लाखांची मदत

453

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात  कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस आज (शनिवार) दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत. यातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर  केली आहे. तसेच  जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारांचा सर्व खर्चही सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत १७ मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले असून रात्र झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली आहे.  

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली. या बसमध्ये ड्रायव्हरसह ३४ जण होते. यांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दापोलीवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. यामधील बचावलेले एकमेव कर्मचाऱी प्रकाश सावंत यांनी बस कोसळत असताना बाहेर उडी घेतल्याने ते बचावले आहेत.

हा घाट अत्यंत अवघड असून जिथे हा अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नाही, त्यामुळे नेमका अपघात कसा झाला ते समजू शकलेले नाही. बस जेव्हा कोसळली तेव्हा अनेकजण फेकले गेले आणि झाडांमध्ये अडकले असेही स्थानिकांनी सांगितले.