पोलादपूर बस दुर्घटना; सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री

131

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – पोलादपूर येथील आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात ३२ जणांचा मृत्य़ू झाला आहे. अपघातस्थळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा दाखल झाली आहे. सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाबळेश्वर येथील बस अपघातात ३२ मृत्यूमुखी पडलेल्याच्या वृत्ताने  मला अतिव दुःख झाले आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.

पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस  आज (शनिवार) सकाळी १० च्या सुमारास दरीत कोसळली.   या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी सर्वप्रथम दिली. आता या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.