पोटच्या मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेसह पाच जणांना अटक; राहत्या घरात सुरू होता वेश्या व्यवसाय

151

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पहिल्या पतीपासून झालेल्या पोटच्या 14 वर्षीय मुलीकडून आणि आणखी दोन महिलांकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणा-या महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या रहिवासी फ्लॅट मधून गांजा आणि दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 27) दुपारी तीन वाजताच्या सुमारास मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत करण्यात आली.

महिला आरोपी (वय 32) आणि अजय नारायण माने (वय 22, रा. दोघेही रा. श्रेयस हाईटस्‌, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी), ओंकार बाळासाहेब कदम (वय 22, रा. करावागज, ता. बारामती, जि. पुणे), राकेश रामजीलाल चौधरी ऊर्फ सहारान (वय 32, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी), मांगीलाल सुरतसिंग बुगालिया (वय 32, रा. प्राधिकरण पेठ क्रमांक 23, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले यांनी बुधवारी (दि. 28) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी हिने आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस वेश्‍या व्यवसास लावले होते. तसेच आरोपी महिला अन्य दोन महिलांकडूनही वेश्‍या व्यवसाय करून घेत होती. महिला आरोपीच्या घरात गांजा आणि दारू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी अल्पवयीन मुलीसमोर तीन ग्राहक अश्‍लील चाळे करीत होते. पोलिसांनी घराची झडती घेतली असता महिला आरोपीच्या घरात 476 ग्रॅम गांजा आणि विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी गांजा आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

मासुळकर कॉलनी, पिंपरी मधील एका सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकार सुरू होता. त्यामुळे त्या फ्लॅटमध्ये कोण आणि कशासाठी येत आहे, याबाबतची माहिती सोसायटीमधील इतर फ्लॅटधारकांना नव्हती. पोलिसांनी छापा घातल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस निरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.

WhatsAppShare