“पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”

79

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : “पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा” असे वादग्रस्त विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

“पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली माझी इथल्या मतदारांना विनंती आहे ही चूक घडू देऊ नका. तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण काँग्रेसला मतदान करायचे,” असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. याआधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना अजब ऑफर दिली होती. ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मतं मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातलं जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तिथल्या अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिलं जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. विशेषत: या सर्व गावांमध्ये गावजेवणाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं.

WhatsAppShare