पैशाच्या वादातून पिंपळे गुरवला खून

160

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, पैशांच्या वादातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संतोष कुलकर्णी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून गणेश थोरात असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. अवघ्या पाच तासांत आरोपीला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मृत संतोष आणि गणेश हे दारू प्यायला बसले होते. दोघांची ओळख नव्हती परंतु दारु प्यायला एकत्र बसल्याने एकमेकांना ते मनातलं बोलत होते. तेव्हा, आरोपी गणेश थोरात याने दहा हजार रुपये हवे आहेत, असं संतोष कुलकर्णीला म्हटलं. त्यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या संतोषने मी तुला दहा हजार देतो असे म्हटले, मात्र नंतर प्रत्यक्षात खिशात असलेले केवळ १२५ रुपये त्याने गणेशला काढून दिले. आरोपी गणेशला याचा प्रचंड राग आला आणि दहा हजार रुपये देतो असे म्हटलास आणि केवळ १२५ रुपयेच दिलेस असे म्हणत त्याने डोक्यात दगड घालून संतोषचा खून केला.

घटनास्थळी संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या पाच तासात आरोपी गणेश थोरातला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग यांच्या पथकाने तपास केला आहे.

WhatsAppShare