पॅरोलवर सुटल्यानंतर पुण्यातील ‘या’ कुख्यात गॅंगचा म्होरक्या खंडणी घेताना जाळयात

174

पुणे, दि. ९ (पीसीबी) : पॅरोलवर सुटून बाहेर आल्यानंतर पुन्हा गॅंगचा जम बसविण्यासाठी खंडणी उकळणाऱ्या न्यू रायझिंग गँगच्या म्होरक्यासह तिघांना गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. व्यावसायिकाला धमकावत त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना त्याला अटक करण्यात आली. विशाल उर्फ जंगल्या शाम सातपुते, मंगेश शाम सातपुते (दोघे रा. पीएमसी कॉलनी घोरपडी पेठ) व अक्षय दत्तात्रय भालेराव (रा.पापडेवस्ती, भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचा टिंबरमार्केट येथे होलसेल साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. ते बिबवेवाडी परिसरात राहतात. तर यातील मुख्य आरोपी विशाल उर्फ जंगल्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. न्यू रायझिंग या नावाने तो गॅंगही चालवितो. या गँगचा तो म्होरक्या आहे. यादरम्यान तो स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात 8 वर्षानंतर पॅरोलवर सुटून आला आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला आहे.

परंतु, त्याने कारागृहातून येताच तक्रारदार यांना सतत वेगवेगळ्या मोबाईलवरून फोनकरून “मी पुण्याचा भाई आहे. माझी टोळी असून, मला शहरात जम बसवायचा आहे. त्यामुळे 2 लाख रुपयांची खंडणी द्यावी. अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. तर पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना नगर रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलात बोलवले. येथे तडजोडीअंती त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी घेताना या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.