पूर्व वैमानस्यातून तरुणावर खुनी हल्ला

0
56

काळेवाडी, दि. 05 (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नखाते नगर कमानी समोर रहाटणी येथे घडली.

रोहन सुनील जाधव (वय 19, रा. रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत लोखंडे (वय 22), आर्यन कुचेकर (वय 21), सिद्धांत वाघमारे, अशोक लोखंडे (वय 55, सर्व रा. का) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन जाधव आणि त्यांचा मित्र विकी राऊत हे दत्त नगर कॉलनी येथे बर्फाचा गोळा खात थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून रोहन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत रोहन यांना जबरदस्तीने रिक्षात घालून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना लोखंडी रॉड, लाकडी फळीने बेदम मारहाण केली. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी संकेत आणि आर्यन या दोघांना अटक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.