पूर्व किनारपट्टीवर आज धडकणार गुलाब चक्रीवादळ; ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

125

देश,दि.२६(पीसीबी) – या वर्षी मे महिन्यात लागोपाठ आलेल्या यास आणि तौक्ते चक्रीवादळांनंतर आता पुन्हा एकदा भारतीय किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ धडकणार आहे. केंद्रीय हवामान विभागानं ही माहिती दिली असून संध्याकाळच्या सुमारास ते ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दरम्यान भारतीय किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार, किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच, चक्रीवादळाचा संभाव्य तडाखा बसल्यानंतर तातडीने काम सुरू करण्यासाठी बचावपथकं देखील सज्ज झाली आहेत. याआधी २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दरम्यान भारतीय किनारी भागात धडकलं होतं. तर तौक्ते चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकलं होतं.

गुलाब चक्रीवादळ ओडिशामधील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशमधील कलिंगपटनम या जिल्ह्यांच्या किनारी भागात लँडफॉल करणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार हे दोन्ही जिल्हे आणि आसपासच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील संभाव्य प्रभावित क्षेत्रामधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर गुलाब चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकेल. २९ सप्टेंबरला हे वादळ पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमधील उत्तरेकडील काही जिल्हे आणि तामिळनाडू-तेलंगणामधील काही भागात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. ओडिसामध्ये आज सकाळपासूनच पावसानं जोर धरला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास घेतलेल्या नोंदीनुसार गुलाब चक्रीवादळ गोपालपूर जिल्ह्यापासून १८० किमी अंतरावर असल्यंच दिसून आलं. तसेच, आंध्र प्रदेशमधील कलिंगपटनमपासून त्याचं अंतर २४० किलोमीटर इतकं नोंदवण्यात आलं होतं.

अवघ्या चार महिन्यांपूर्वीच ओडिसाला यास चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. तज्ज्ञांच्या मते यंदा आलेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता तितली चक्रीवादळाइतकी असणार आहे. यासाठी ओडिसामधील गंजम आणि गोपालपूर या जिल्ह्यांमध्ये सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकट्या गंजम जिल्ह्यात १५ बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. या चक्रीवादळाला पाकिस्ताननं दिलेलं गुलाब हे नाव देण्यात आलं आहे. भारतीय उपखंडात येणाऱ्या चक्रीवादळांची नावं या खंडातील देशांनी दिलेली आहेत. त्यात गुलाब हे नाव पाकिस्तानने दिलं आहे.

WhatsAppShare