पूर्ववैमनस्यातून तरुणावर खूनी हल्ला

152

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत खूनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली.

सौरभ कदम असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शुभम धनाजी कदम (वय 20, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश मोदी (वय 20), सुनील लोणी (वय 20, दोघे रा. शिवनगरी, चिंचवड), कार्तिक गायकवाड (वय 19, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम, त्यांचा लहान भाऊ सौरभ आणि मित्र आशिष जाधव असे तिघेजण मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास चिंचवडेनगर येथील एका फोटो स्टुडिओ समोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून यांना जिवंत ठेवायचे नाही आज यांचा शेवट करून टाकू, असे म्हणत सौरभवर कोयत्याने वार केले. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आरोपी कार्तिक याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare