पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

194

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकू, कोयते, लाकडी दांडक्याने मारहाण करत सहा जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. तर या हल्ल्यात मयत तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री सव्वासात वाजताच्या सुमारास शिवनगरी, बीजलीनगर, चिंचवड येथे घडली.

गणेश मरियाप्पा याड्रमी (वय 22, रा. शिवनगरी, बीजलीनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अश्विनी मरियाप्पा याड्रमी (वय 22) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अमय उर्फ बंटी ठाकरे, आकाश गायकवाड, गौरव परशुराम कांबळे, आर्यन हरनापल्लू, अथर्व उर्फ चन्या शिंदे, प्रकाश गायकवाड (सर्व रा. बीजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन आणि मयत गणेश याचा मित्र हितेश पाटील यांचे गुरुवारी (दि. 2) किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दहशत माजवून चाकू, कोयते आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत फिर्यादी यांचा भाऊ गणेशला ठार मारले.

आरोपींनी हिमांशू पाटील यांच्यावर खुनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच प्रथमेश यादव, राज यादव हे देखील या भांडणात जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक आर बी मोरे तपास करीत आहेत.

WhatsAppShare