पूरसंकटानंतर कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश  

212

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – गेल्या सहा दिवसांपासून महापुराच्या विळख्यात अडकलेल्या  कोल्हापूरकरांची आज (सोमवारी) काही अंशी सुटका झाली आहे. पाण्याचा  निचरा होऊ लागला आहे. तसेच पावसाने विश्रांती घेतल्याने आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल.    प्रशासनाकडून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात  होणार आहे.

मात्र, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी  जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (1) अ ते फ आणि कलम ३७ (३ ) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने  पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार  आहे. पुनर्वसनाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये. मदत कामात गोंधळ टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.