पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या – शरद पवार

220

पुणे, दि. ८ (पीसीबी) – राज्यात पूरग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानीचे तातडीने मोजमाप आणि पंचनामे शासनाने करावेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागाला मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला आहे. या पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा भाग ऊस उत्पादनातील अग्रेसर भाग असून इथल्या पुरामुळे ऊसाच्या एकंदर उंचीपेक्षा अधिक भागापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. त्यामुळे या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर येथील काही भागात द्राक्षे आणि इतर फळांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जमिनीवरची माहितीही मोठ्या प्रामाणावर वाहून गेली आहे. तसेच घरे, रस्ते इतर पायाभूत सुविधा आणि जनावरेही वाहून गेली आहेत. अशा प्रकारे इथल्या शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांमधील अशी परिस्थिती मी आजवर कधीही पाहिली नव्हती. पण यावेळी पुराची व्याप्ती आणि ज्या भागात पूर आला आहे त्या भागातील शेतीचे झालेले नुकसान पाहता, पाणी ओसरल्यानंतर शासनाने तातडीने येथील नुकसानीचे मोजमाप आणि पंचनामे करावेत. तसेच पूरग्रस्त भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली आहे.