पूरग्रस्तांसाठी मदत करताना माझ्या फोटोचा वापर नको – खासदार संभाजीराजे

122

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगलीतील महापूर आता ओसरू लागला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले आहेत. तर काही जणांकडून मदतीच्या नावांखाली चमकोगिरी सुरू आहे. यावर खासदार संभाजीराजे यांनी चोख उत्तर दिले आहे. पूरग्रस्त लोकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचे आहे, ते निस्वार्थ भावनेने द्या!,  असे ट्वीट त्यांनी केले आहे.     

संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना ५ कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे.  माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझे संपूर्ण जीवनच समर्पित आहे,  असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राज्य  सरकारकडून देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात  आले होते. यावर जोरदार टीका झाल्यानंतर  सरकारने ते स्टीकर हटवले होते. राष्ट्रवादीनेही अन्न धान्यांच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो टाकले होते.  मात्र, यावर राष्ट्रवादीकडून  खुलासा करण्यात आला होता.